बुधवार, 31 जनवरी 2024

सिनेमा लोकशाहीचा ट्रेलर व म्युझिक लॉंच सोहळा संपन्न

शंकर मराठे, मुंबई - ३१, जानेवारी २०२४ - लोकशाही चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. हीच उत्सुकता पुढे ताणत ३० जानेवारी २०२४ रोजी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉंच सोहळा दणक्यात पार पडला आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या जबरदस्त ट्रेलर आणि चित्रपटातील गाण्यांने रसिकांचं मन जिंकून घेतलं असून सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. 


घराणेशाहीत जगणाऱ्या प्रस्थापितांचा कोणत्याही थराला जाऊन सत्ता मिळवण्याचा हव्यास ट्रेलरमधून दिसत आहे. या सत्तासंघर्षात कोणाचातरी जीव जाणार आहे, पण कोणाचा जीव कोण घेणार या रहस्याचं कोडं चित्रपटात उलगडणार आहे. मनाला प्रश्नांच्या घेऱ्यात अडकवणारं कथानक, गंभीर आणि खोल संवाद, दर्जेदार कलाकारांची जुगलबंदी, मंत्रमुग्ध करणारी गाणी आणि अंगावर शहारे आणणारं पार्श्वसंगीत या समीकरणामुळे लोकशाही चित्रपटाची चर्चा महाराष्ट्रात सर्वत्र होताना दिसत आहे.  

चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा चित्रपटाचे निर्माते सुशीलकुमार अग्रवाल, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, तेजश्री प्रधान, अमितरियान आणि सर्व कलाकार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दणक्यात पार पडला. मोहन आगाशे यांनी ‘चित्रपट निर्मितीची प्रक्रिया धमाल मजेदार होती’ असं सांगितलं असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची त्यांना प्रचंड उत्सुकता आहे. संगीत दिग्दर्शक संजय राजी या जोडीमधील राजी यांनी 'सख्या रे' हे सुमधुर आणि जयदीप बागवडकर यांनी 'ओ भाऊ' हे उत्साही गाणं गाऊन सोहळ्यातील उपस्थितांची मने जिंकली. 

"गेली चाळीस वर्ष अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, भारतीय सिनेसृष्टीत सिडी डिविडीपासून ओटीटीपर्यंत बदलत्या तंत्रज्ञानासोबत जुळवून घेत दिमाखात आपलं अस्तित्व टिकवून आहे. लोकशाही हा राजकारणातील अराजकता टिपणारा आणि घराणेशाही व्यवस्थेवर बोट ठेवणारा प्रभावी चित्रपट आहे." असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री.सुशीकुमार अग्रवाल म्हणाले.

अंबरनाथच्या शिवमंदिरासाठी पुरातत्व खात्याची धावाधाव

शंकर मराठे - मुंबई, ३१ जानेवारी २०२४ - सुमारे एक हजार वर्ष जुने असलेले अंबरनाथचे शिवमंदिर स्थापत्य कलेचा उत्कृष्ठ नमुना म्हणून अभ्यासकांना खुणावत असते. 


अंबरनाथमधील शिलाहार काळातील उत्कृष्ठ स्थापत्य कलेचा नमुना असलेल्या शिवमंदिराच्या शिल्पांची झिज होत असून त्यावरील शिल्प निखळल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्येष्ठ प्राच्यविद्या अभ्यासक डॉ. कुमुद कानिटकर यांनी नुकतीच मंदिराला दिलेल्या भेटीदरम्यान ही बाब समोर आली. त्यांनी याबाबत समाजमाध्यमांवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर भारतीय पुरातत्व विभागाने मंदिर परिसरात धाव घेत काही पाहणी केली आणि काही गोष्टी बंद करण्याचे सांगितले आहे. मंदिरात आणि परिसरात सुरू असलेल्या काही गोष्टींवर डॉ. कानिटकर यांनी यापूर्वीच नाराजी व्यक्त केली होती.

सुमारे एक हजार वर्ष जुने असलेले अंबरनाथचे शिवमंदिर स्थापत्य कलेचा उत्कृष्ठ नमुना म्हणून अभ्यासकांना खुणावत असते. येथील शिल्प, त्यावरचे संदर्भ इतिहास अभ्यासकांसाठी पर्वणीच असते. डॉ. कुमुद कानिटकर यांनी २५ वर्षे यावर अभ्यास करत मंदिराचे स्थापत्य वैशिष्ट्ये जगासमोर आणली. त्यांच्या अभ्यासात या मंदिरातील शिल्पांना नियमीत पुजाविधी आणि उपक्रमांमुळे धोका पोहोचत असल्याचे त्यांनी यापूर्वीच सांगितले होते. त्यानंतर मंदिराच्या आवारात ध्वनिक्षेपण यंत्रणा, वास्तूवरील शिल्पांवर तसेच मुर्तींवर होणारा दुग्धाभिषेक, नारळ फोडणे आणि होमहवन असे प्रकार सुरूच राहिले.

नुकतेच तामिळनाडू येथील काही पर्यटक अंबरनाथ येथे हे मंदिर पाहण्यासाठी आले होते. डॉ. कुमुद कानिटकर या त्यांना मंदिराबाबत मार्गदर्शन करत होत्या. या पाहणीवेळी मंदिराच्या मागच्या बाजुला असलेली लिंगोद्भव शिल्पाशेजारी असलेली विष्णुची मुर्ती तिथे नसल्याचे त्यांना दिसून आले. येथे अंतराळाच्या उजव्या खांबावर असलेली सूर्यमूर्ती येथे नाही. हे शिल्प निखळून त्याचा तुटलेला भाग शेजारी ठेवण्यात आल्याचे डॉ. कुमुद कानिटकर यांनी सांगितले. तसेच मंदिरातील काही शिल्पांचीही मोठ्या प्रमाणात झिज झाल्याचे समोर आले आहे. याची माहिती समाजमाध्यमातून दिल्यानंतर मध्यरात्रीच पुरातत्व विभागाचे अधिकाऱ्यांनी मंदिरात धाव घेत उपाययोजनांना सुरूवात केली. मात्र मंदिराच्या वास्तूलाही धोका निर्माण होत असल्याचा दावा केला जातो आहे.

“ही बाब निदर्शनास आल्यानंतर तातडीने धाव घेत येथे काही गोष्टींवर निर्बंध घालण्यात आले आहे. ध्वनीक्षेपक, दुग्धाभिषेक, नारळ फोडणे अशा गोष्टी रोखणे आवश्यक आहेत. नियमीत स्वच्छतेचेही आदेश देण्यात आले आहेत. लवकरच येथील संरचना संरक्षित करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील”, असे भारतीय पुरातत्व विभागाचे पुरातत्व अधिकारी कैलास शिंदे यांनी म्हटले आहे. “शिवमंदिराचे वैभव टिकवण्यासाठी सर्व विभागांची बैठक बोलावून त्यात काही गोष्टी ठरवण्याची गरज आहे. त्या गोष्टींचे पालन होणे आवश्यक आहे”, असे मत डॉ. कुमुद कानिटकर (प्राच्यविद्या संशोधक, मुंबई) यांनी व्यक्त केले.